किती वाट पाहिली तुझी? वाटले, येतोस की नाही.आकाशात ढग दाटले की चाहूल लागते तुझी.मंद गार वारा आणि त्यावर स्वार होऊन येतात त्या धारा. कधी शांत ,अबोध रिमझिम तर कधी दमदार बरसात, तर कधी गंभीर संततधार अशी अनेक रुपं तुझी! कधी थोडा विसावा धेतलास, तर आसमंतात शांतता पसरते. लहानपणी छप्परावर नाचणारा तू, आजही साद घालतोस.छोट्या छोट्या कागदी होड्या बनवून त्या साचलेल्या डबक्यात सोडायच्या. बुडणार त्या हे माहिती असायचे , पण त्यांच्या क्षणभर तरंगण्याचा केवढा आनंद वाटत असे. तुझे स्वागत आईनं केलेल्या भजीने व्हायचे. त्या अल्लड वयात तुझ्या तुषारांचा रोमांच! उफाळून आलेला समुद्र आणि मेघांनी मोहरलेले डोंगर ! कधी अचानक दिसलेले इंद्रधनुष.सगळे अद्भुत. प्रणयाच्या क्षणांना तुझ्या संगीताची साथ! तुझ्या धास्तीने लोकलचा केलेला प्रवास आणि कितीही पैसे मोजून घराकडे घेतलेली धाव,मग आलं घालून चहा आणि सगळ्यांची विचारपूस. तुझ्या बरोबरीचे अस्थानी पराक्रम आणि तद्नंतर मिळालेला औषधांचा खुराक,हे कधी चुकले नाही . घरी एकटेच असताना ,तू सोबत करतोस की कुठल्या अनामिक भीतीला निमंत्रण देतोस, हे कळलेच नाही . जितका अल्लहाददाय...